Monday 24 October 2016

सुरगड श्रमदान मोहीम-९ऑक्टोबर २०१६(सोबत दुर्गवीर परिवार)

पुरातत्व खाते व महाराष्ट्र संवर्धन समिति अंतर्गत स्वच्छता मोहिमे निमीत्त ही तशी तिसरी मोहिम. पहिल्या दोन मोहिमा यशस्वी पार पाडल्या होत्या.आता तिस-या मोहिमेसाठी आम्ही दुर्गवीर सज्ज झालो होतो.

शनिवार-रविवार रजा असल्याने माझ्या डोक्यात ब-याच विचारांच काहुर माजल होत, तस पाहता मी दुर्गवीर सोबत अनेक श्रमदान मोहिमा केल्यात तरही ही श्रमदान मोहिम खास असण्याला अनेक कारण होती, त्यातला एक कारण म्हणजे माझी “सुरगड” वर पहिलीच श्रमदान मोहिम होती आणि दुसर आणि महत्वाच कारण म्हणजे नितीनजी नी या गडाबद्दल काहीस औत्सुक्यपुर्ण माहिती दिली होती. त्यांनी मला सांगितली होती ,कि गड खुप कठिण आहे.एक पॅच जरा रिस्कीच आहे. पण गड खूप छान आहे जाऊन बघ,त्यामुळे डोक्यात नव्या आव्हानाची तयारी केली होती फक्त प्रत्यक्षात सुरगडाच्या दर्शनाची आस लागली होती.
ठरल्याप्रमाणे जागेवर पोहोचायची तयारी केली पण काय करणार सालाबादप्रमाणे मला उशिर झालाच, सर्व दुर्गवीर / दुर्गविरांगणांना आम्ही जुईनगरला भेटलो पुढे थोडेसे खावुन पोटाला आधार देत आगेकूच करायला सुरू केली, मला एक खाद्य नविनच होते ते म्हणजे 😋गोडदही+चिबुड😋जे “धिरु सरांनी” आणले होते ,मी कोकणातली असुनही पहिल्यांदा गोडदहि + चिबुड हा प्रकार ऐकला आणि खाण्याचा योगही त्या दिवशी आला काय अप्रतिम होते ते (धिरु सर पुन्हा कधीतरी घेऊन या हो स्वीट डिश)😋
मोहिमेला जाताना श्रमदानाचे साहित्य लागणार म्हणून प्रज्वलच्या घरी जाऊन श्रमदानाचे साहित्य घेतले. मोहिमेला सुरूवात झाली आमचा महिलांचा गप्पा टप्पाचा फड चालू झाला आणि बघता बघता सुरगड कधी आला हेच कळले नाही ,सुरगडावर जाण्यासाठी काही मावळे आधीच पोहचले होते.
आम्ही पहाटे ४ ला पार्टे बाबांच्या घरी पोहचलो त्याचे आणि दुर्गवीर चे संबध घरच्यांसारखेच त्यामुळे घरातलेच आहोत असे आम्ही वागत वावरत होतो.जणू लहान मुलांची सहल यावी आणि मनसोक्त वागावे असेच चालले होते.
पहिला प्रहर होणार यात आमच्या निघण्याची लगबग चालू झाली. कांदेपोहे फस्त करत गड सर करण्यासाठी सर्वांनी कुच केली. रानावनात भटाकायची हौस आहे पण गावी जाण येण नसल्याने फारशी माहीती नाहि पण त्याचा अनुभव घ्यायला गडकिल्ले फिरावेत. रानातली झाडे त्यातून जाणारी ती नागमोडी वाट बाजूला एखादी पडीक विहीर पाहत वाट तुडवत पुढे निर्सग पहात निघाले. मध्येच नदीने(ओढा) आडवलेली वाट तिच्या कुशीतून आम्ही पुढे पुढे सरकत होतो. मुबंईत हे अस प्रसन्न वातावरण अनुभवने तसे दुर्मिळच.... मी तर मज्जा करत त्या नदीच्या(ओढ्याच्या) पाण्यात चालत होते, खूप सुंदर नदी होती ती, थोड्याच वेळात सुरगडच्या त्या माथ्यावर पोहचलो. खरं तर त्या गडावरील अन्साई देवीच्या दर्शनाने सर्वाचा त्राण कमी झाला. सर्वांनी स्वतःचा परिचय करून दिला. आता खरी मज्जा पुढे होती. दोरी बांधून तो पॅच चढणे, हो ज्याची मी आतुरतेने वाट पहात होते. खरच इतिहासात मावळे चपळाईने गडावर कसे चढत असतील या विचाराने मन शहारुन निघत होते. या विचाराने थोडी भिती मनात होती. पण धिरु सरांनी अगोरच धीर दिलेला असल्याने स्वतः वर विश्वास ठेवुन तो पॅच पार केलाच. एक वेगळा अनुभव मिळाला ,पण रसिका आणि हेमांगी याचं पण कौतुक त्यांनी तो पॅच न घाबरता पार केला, पण गितुताईचे मला खूपच कौतुक वाटते कि पायाची अडचण असूनही तिने तो पॅच पार केला.

सर्वांनी हा अनुभव गाठीशी घेत आम्ही पुढे कुच केली.शेवटी आम्ही गवतातुन वाट काढत धान्य कोठाराकडे पोहचलो. आता मोहिमेला सुरूवात करण्यासाठी तीन विभागात आम्ही सर्व तुटून पडलो.
साफ सफाई करत दुर्गवीरचे शिलेदार हा हा म्हणता मारूती मंदिर , शिवमंदिरचा परिसर साफसफाईचे काम केले. तसे दुर्गवीरचे मावळे आणि दुर्गवीरांगना आम्ही काम फत्ते हे करणारच आणि केले ही झालेल्या कामाने समाधानाने सर्वांनी एक नजर फिरवली मग भटकंती सुरू झाली गड फिरत असताना गडावरील कोरीव शिलालेख त्यावेळचा इतिहासच सांगत असावा. गडावरील विचारपुर्वक केलेले बांधकाम हे या काळातील इंजिनियर लोकांना ही लाजवेल इतक्या सुखसोयी करून ठेवल्या होत्या त्याच्या या विचारसरणीने मी थक्कच झाले.

दुपार जशी होत गेली तसे आम्ही मारुती मंदिर चा परिसर साफ करून मारुतीची पूजा केली.आणि गड उतरायला निघालो.परत तो पॅच सांभाळत उतरलो.घरी येऊन पोटपूजा केली आणि पार्टे आई नी चहा साठी पण आग्रह केला ,थोडी मी डुलकी पण घेतली कारण दमले होते. 4 वाजता मुंबईच्या दिशेने कूच केली. हा रस्ता पण मध्ये मध्ये खूप खराब त्यामुळे शेवटी द्रुतगती मार्गाला पोहचायला ९ वाजले. नंतर मात्र सुसाट वेगाने मुबंई गाठली.
आज मी आणि माझे घर याचा प्रत्येजण विचार करत आहे, मग या धरोवराची काळजी करणार कोण ? तसे तर महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ला पर्यटन खात्यासाठी एक सोन्याची खाण आहे पण म्हणतात ना .... गुळाची चव काय माहित असो... पण त्याही पुढे येणारा पर्यटक हा स्वताला शिवरायांचा मावळा म्हणवतो पण या इतिहासाच्या साक्षीदारांवर घाव घालून त्यांनाच घायाळ करतो, हे सर्व पाहवत नाही. हिच संपत्ती अनेक वर्षानुवर्ष महाराजांचा हा इतिहास गगणभेदि गर्जनेने जगासमोर यावा यासाठी आमच्या दुर्गवीर प्रतिष्ठान धडपडत आहे.
तीनही मोहिमा फत्ते केल्याचा आनंद आमच्या प्रत्येकाच्या चेहर् यावरून ओसंडून वाहत आहेत आमच्या सोबत आलेले नवीन शिलेदार ना खूप छान वाटलं,
घरी जाताना खरच जड अतंकरणाने सुरगडाने निरोप घेतला खरा पण एवढ्या कळकळीने हेही सांगत होता जशी माझी काळजी घेतलीत तशीच माझ्या इतर गडकिल्यांची ही घ्या
हिच साद आज प्रत्येक किल्ल्याची असून अशा मोहिमा आयोजित करून या इतिहासाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न दुर्गवीर प्रतिष्ठान करते, म्हणतात हाताला हात मिळाले कि बळ

वाढते.
असे अनेक शिलेदार मिळुन जर का हि धरोवर जतन केली तर पुढची पिढी आपल्याला लाखलाख धन्यवाद देतील🙏
कल्पु-उवाच.com
जय शिवराय
http://kalpuuvach.blogspot.in/

Saturday 22 October 2016

सिंधुदुर्ग किल्ला (मालवण) माझ्या जीवनातला एक अविस्मरणीय दिवस



🌴🙏सिंधुदर्ग किल्ला मालवण जवळच्या अरबी समुद्रातील एक स्वराज्याची शान, शिवरायांच्या कर्तबगारीची अवाढव्य साक्ष, कोकण किनार्याची शोभा वाढवणारा हा ऐतिहासिक किल्ला.
सिंधुदुर्ग किल्ला (मालवण)
या किल्ल्याला भेट देण हा माझ्या जीवनातला एक अविस्मरणीय दिवस.rkfc कुटूंबाच्या स्नेहसंमेलनामुळे शक्य झाला
सिंधुदुर्ग किल्ल्यावर जेंव्हापासून जायचं ठरलं तेंव्हापासून नेहमीसारखाच हा दिवस कधी उजाडतोय याचीच वाट पाहत होते,
आम्ही वेंगुर्ला वरून दिनांक २८ मे रोजी सकाळी ८.०० वाजता निघालो मालवणला पोहचायला ११.०० वाजले.तिकडेच आम्ही चहा नास्ता केला आणि थेट सिंधुदुर्ग किल्ल्यावर. मालवण मधील बाजारपेठेत थोड ट्राफिक भेटलं मन खूप उदास झाल होत. आधीच पोहचायला उशीर झाला होता आणि त्यात हे थोडस ट्राफिक. आणि 2 तासांचा प्रवास करून थकलेल शरीर, तरीही किल्ल्यावर जायची उत्सुकता, गुगलवर सर्च करून करून बरीचशी माहिती मिळवली होती. पण प्रत्यक्षात पाहण्यात जी मज्जा असते ती तुम्हालाही वेगळी काही सांगायला नको. किनार्यावर पोहचल्या… पोहचल्या किल्ल्याच दुरूनच दर्शन झालं.
निसर्गरम्य, नयनरम्य ठिकाण आणि किल्ल्याच ते रूप पाहून क्षणात अंगातील सारा क्षीण उतरून गेला होता.
शाळेमधून सहल जायची. पण तेंव्हा एवढ काही गड किल्ल्याचं आकर्षण न्हवत.. जेव्हापासून दुर्गवीर मध्ये सदस्य झाले तेंव्हापासून ठरवलंच शिवरायांचेच गडकोट फिरायचं तेंव्हापासून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचं ठरल होतं आणि तो दिवस आज आलाच..
मालवणच्या किनार्यावरून त्या दूरवरच्या किल्ल्याकडे पाहिलं कि किल्ल्याकडे पाहतच रहाव आणि तिथच रमावं अस वाटतं. किनार्यावरून किल्ल्यावर जायला तिथे चांगली सोय आहे. एका ४० /५० आसनी होडीत बसून किल्ल्यावर जायची सोय आहे. ५० रुपये तिकिटाच्या ४४ तिकीट घेतल्या आणि आम्ही निघालो त्या होडीत बसून. अथांग समुद्रात हेलकावे खात आमची होडी निघाली. जस जस किल्ल्याच्या जवळ जातोय तशी मनात एक वेगळीच उत्सुकता दाटली होती. किल्ल्याच्या बाहेरच्या समुद्री पाण्यात मोठे मोठे खडक डोक वर काढत होते. त्यामुळे नावाडी आमची होडी त्या खडकांवर आदळू नये याची विशेष खबरदारी घेत होते. त्यातून वाट काढत आम्ही कधी किल्ल्याजवळ पोहचलो ते कळलेच नाही. होडीतून उतरून समोर पाहिले ते सिंधुदुर्ग किल्ल्याच आवाढव्य रूप नजरेत भरलं. समोरच दिसणारा दरवाजा दिसला आणि त्या दरवाजाच्या वरती असणाऱ्या भिंतीच्या टोकावर भगवा झेंडा.
किल्ल्याच्या दरवाजाकडे.मारुतीची मूर्ती
आत शिरताच समोर असणारी मारुतीची मूर्ती तिला वंदन करून दरवाजाच्या वरच्या साईट जायला उजवीकडे पायर्या आहेत .किल्याच्या तटावरून गोल फेरफटका मारला. शिवरायांनी कसा आणि किती मेहनतीने हा किल्ला बांधला असेल यावर चर्चा रंगत होती. सभोवार नीळा समुद्र आणि किल्ल्याच्या तटांवर आदळून फेसाळणार्या लाटा मनाला प्रसन्न करत होत्या. तटबंधी फिरून झाल्यावर आम्ही किल्ल्याच्या मधोमध आलो. उत्सुकता होती ती गोड पाण्याच्या विहिरींची. एवढ्या मोठ्या खाऱ्या पाण्याच्या समुद्रात मधोमध गोड पाण्याच्या तीन विहिरी म्हणजे जगातलं एक आश्चर्यच आहे. त्या विहिरींची नाव आहेत दुध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर या तिन्ही विहिरी पाहून खरच धन्य झाल्यासारखं वाटल. पुढे किल्ल्यावर लोकवस्ती हि होती तिथे चार पाच घरे दिसली. बाजूलाच संपूर्ण महाराष्ट्रात फक्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर आढळणार एकमेव शिवरायांच मंदिर ” श्री शिवराजेश्वर मंदिर” या मंदिराची स्थापना राजाराम महाराजांनी केली होती. या मंदिराच वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील शिवरायांची मूर्ती हि शिवशंकरांच्या रुपात आहे. मूर्तीच्या बाजूला दोन तलवारी, ढाल, जिरेटोप ठेवलेला आहे. त्या शिवमूर्तीच दर्शन घेवून आम्ही किल्ल्याचा निरोप घ्यायचा ठरवला.
श्री शिवराजेश्वर मंदिर
शिवरायांची मूर्ती हि शिवशंकरांच्या रुपात
बाहेर समुद्र किनार्यावर थोडी मौज मस्ती करून आम्ही पुन्हा निघालो ते किल्ल्यापासून दूर.. पुन्हा कधीतरी येईन असाच मनाला समजावून. आम्ही होडीत बसलो आणि मालवणच्या किनार्यावर पोहचलो.
सिंधुदुर्ग किल्ला अजूनही मनात तसाच साटला होता. कितीतरी वेळ ते दृश, किल्ल्याच रूप डोळ्यांसमोरून हलतच न्हवत.
आणि शिवकालीन बखरकार चित्रगुप्त यांनी आपल्या बखरीत लिहिलेला मजकूर आठवला.
🙏“सिंधुदुर्ग जंजीरा,जगी अस्मान तारा ।
जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार ।
चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।”🙏

🙏“तोड नाही जगी या स्वराज्याच्या शिवराया
सिंधुदुर्गावर सागर अवतरला माझ्या राजांचे पाय धराया
धन्य झाला तोही राजांचे चरणस्पर्श होता
जागा दिली कुशीत झाला स्वराज्याचा रक्षणकर्ता”🙏


दसरा २०१६





दसरा :- २०१६
हिंदू संस्कृतीनुसार दसरा म्हणजे साडेतीन मुहुर्तापैकी एक. हीच ऐतिहासिक संस्कृती दुर्गवीर परीवार सातत्याने जपतो. गेल्या वर्षीसुद्धा दसरोत्सवात मी सामिल झाले होते परंतु या वर्षीचा काही “विषेश” च होता.
आता तुम्हाला वाटेल कि दसरा काय तो सर्वच साजरा करतात, पण यावर्षी खरच विशेष होता कारण मला आणि माझ्या दुर्गवीर परीवाराला एक “नवीन सदस्य” जवळून पाहणार होती ती म्हणजे माझी आई ! हो आई जी मला सर्व गोष्टीत प्रोत्साहन देऊन सहकार्य करते ती “माझी आई”. तीला ह्या या मोहिमेची “खास पाहुणी” म्हणून उपस्थित रहायचा मान मिळाला. तस पाहिले तर माझ्या आईला मुलगी कामावरुन आल्यावर सतत सोबत रहावी असे वाटते का ते कदाचित तिचे ते प्रेम असावे. असो पण मोहिमेला निघताना काळजीने ओरडायची पण मनातुन नेहमी आशिर्वाद देवुनच पाठवत होती. माझे तसे दुसरे वर्ष दसरा सोहळ्याचे पण आकर्षण इतके कि, कधी एकदा दसरा येतो आहे असे झाले होते. पाहता पाहता तो दिवस तो उजाडलाच, आई सोबत असल्याने थोडा उशिर होणारच होता तो झालाच घाईत एकदाचे विरारला पोहचलो पण गितुताई आणि नितीनजींचा (प्रेमळ) ओरडा खाल्याशिवाय प्रवास सुरू कसा होणार आणि कारण देणे हा स्वभावच माझा...
हा विजयोत्सव या वर्षी अर्नाळ्याच्या जंजि-यात साजरा होणार होता. उपस्थिती पण तशी २५ जणांची होती. इतिहासातील अर्नाळा किल्ला समुद्राच्या थोड्या पलिकडे नारळाच्या बनात दडलेला. डावीकडे गोल बुरूज आणि उजवीकडे नविनच बांधलेले मंदिर. बोटीतून रम्य दृश्य दिसत होते किना-यालगतच लाटांचे वार झेलत डौलाने उभ्या असलेल्या किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो. पोहचल्यावर सर्वांनी जोशाने कामाला सुरुवात केली. महादरवाजा आणि आतील परीसर साफसफाई करायला सुरूवात केली. यात खास पाहुणी(आई) सहभागी होतीच. शिवकाळात सणासुदिला गड जसे सजवले जात तसे वातावरण निर्माण झाले होते. महादरवाजात आम्ही पाण्याचा सडा मारून रांगोळी काढत फुलांनी गड सजवले. मग आम्ही पांरपारिक वेशभुषा करून छत्रपती शिवाजी महाराजांची सुबक मुर्तीचे पुजन केले. पुजन आटोपल्यावर नितीनजींच्या गगनभेदि गर्जनेने शिवमय वातावरण निर्माण केले. गडाचा इतिहास किशोर दादांनी सांगायला सुरुवात करुन त्या शिवमय वातावरणात भर टाकली. समुद्रावर राज्य गाजविण्यासाठी १५१६ मध्ये सुलतान बेगडाने टेहाळण्यासाठी बांधकाम केले. काळानुसार योग्य वाटेल तसे अनेक बांधकाम करत सुधारणा करण्यात आली.
खर तर असे बांधकाम विशेष कारणासहीत केले जाते. तसाच चौकोनी आकाराचा सागराच्या लाटाने वेढलेला उंच व रूंद गडाचे तट एवढे संकट सहन करत अजूनही मजबूत असल्याचे सांगत होते. पण स्थानिक आमचे कोळी बांधव आता मासळी सुखविण्यासाठी करतात तो भाग वेगळा.
इतिहास ऐकत वेळ कसा गेला कळलेच नाही पण समाधान वाटले. प्रत्येकाचा आनंद गगनात मावत नव्हता. आम्ही सजवलेल्या गडाला स्वत:च रुप पाहुन हायसं वाटल असावं. मनोमन आभार मानत असेल त्या दुर्गवीरांचे ज्यांनी हा सण साजरा करून त्याचे जुन वैभव अनुभवल. त्याच जोशात पारंपारीक वेशातील शिव गर्जनानी सारा आसमंत दणाणून सोडत आसमंत आणि गडाची जणू भेटच करून दिली असावी. हा सर्व वेगळा नजराना माझ्या आईसाठी नवीन आणि सुखदच होता त्यातच स्थानिक कोळीआजीने केलेला कोळी पध्दतीचे जेवणानी लोणच्याची चवच ह्या प्रवासाला देऊन गेली
हा सुखद दसरा विशेष मी , आई आणि सर्व दुर्गवीर परीवार अनुभवत निघालो. प्रत्येकांच्या चेह-यावर विशेष तेज होते. पण मला माझ्या आईच्या चेह-यावर तेज आणि माझ्याबद्दल असलेला अभिमान माझ्यासाठी सुखद होता. तसे हा अनुभव देणा-या दुर्गवीर परिवार सदस्यांचे विशेष आभार मानावे ते थोडे !मी पण या दुर्गवीर परिवाराची एक सदस्य असल्याचा मला खूप गर्व आणि अभिमान आहे.🙏
जय शिवराय